X Close
X
9821006358

वृक्ष लागवडीसाठी आम्ही सज्ज ! संकल्पापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा.. अधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास


Min-Sudhir-Mungantiwar-Meeting-1-1024x683
Mumbai:वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी लोकचळवळ मुंबई, दि. 11 : राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी आम्ही सज्ज असून संकल्पापेक्षा अधिक वृक्ष लागवड करू असा विश्वास आज कोकण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला तर वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादन वाढावे या हेतूने महा वृक्ष लागवड अभियान हाती घेतले आहे, हे अभियान पारदर्शकपद्धतीने यशाच्या मार्गाने पुढे जावे, अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. राज्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने कोकण विभागाची आढावा बैठक आज यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री. मुनगंटीवार बोलत होते बैठकीस आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा, राज्यमंत्री वित्त व नियोजन दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह कोकणविभागातील महानगरपालिकांचे महापौर, जिल्हापरिषद अध्यक्ष, पंचायत समिती चे सभापती, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. मनापासून “वना”साठी काम महावृक्षलागवडीमध्ये मनापासून वनासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद देतो असे सांगत वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात ३ लाख ७ हजार ७१२ चौ.कि.मी च्या भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के म्हणजे जवळपास १ लाख चौ.कि.मी वर वनक्षेत्र हवे. आजमितीस ते ६२ हजार चौ.कि.मी इतके आहे. अजून ३८ हजार चौ कि.मीने आपल्याला वनक्षेत्र वाढवायचे आहे. हे वृक्षधनुष्य पेलायचे असेल तर हा वनसत्याग्रह यशस्वीपणे पुढे जायला हवा. हे वृक्ष धनुष्य पेलायचे असेल तर केवळ वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ते शक्य नाही यात व्यापक लोकसहभाग हवा. हीच भावना समोर ठेऊन मागील दोन वर्षांपासून आपण महावृक्षलागवड अभियान राबवित आहोत. पहिल्या वर्षी २ कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पाच्या बदल्यात राज्यात एकाच दिवशी २ कोटी ८३ लाख झाडे लागली तर गेल्या वर्षी ४ कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पाच्या बदल्यात ५ कोटी ४३ लाख वृक्ष राज्यात लागले. या दोन्ही वर्षांच्या वृक्ष लागवडीची नोंद लिम्का बूक ऑफ रेकॉर्डसमध्ये झाली. वृक्ष लावल्यानंतर ते जगतात का याविषयी सातत्याने शंका घेतली जाते असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, हे लोकआंदोलन यशाच्या मार्गाने पुढे नेण्यासाठी यात पारदर्शकता आली पाहिजे हे विचारात घेऊन कमांड रुमच्या माध्यमातून लावलेल्या प्रत्येक झाडाचा शोध आपण घेऊ शकू अशा पद्धतीची व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. अशी कार्यपद्धती अवलंबिल्यानेच राज्य चार क्षेत्रात देशात प्रथम आल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात राज्यात २७३ चौ.कि.मीची भरीव वाढ झाली आहे, कांदळवन संवर्धनात ८२ चौ.कि.मी. ची वाढ झाली आहे, बांबू लागवड ४४६२ चौ.कि.मी. ने वाढली आहे. केंद्र सरकारने बांबू क्षेत्राच्या विकासासाठी १२९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर वनांमधील जलयुक्त शिवार कामांमुळे वनातील जलव्याप्त क्षेत्रात ४३२ चौ.कि.मी. ची वाढ झाली असल्याचेही सांगितले. महा वृक्ष लागवड कार्यक्रमात कोकण विभागात फळझाड लागवड, कांदळवन रोपांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. जवळपास २० लाख कांदळवन रोपं या समुद्रकिनाऱ्यालगतच्या जिल्ह्यात लागणार आहेत. रानमळा गावच्या वृक्ष लागवड पद्धतीचा राज्यभर स्वीकार करण्यात आला आहे. आनंदवृक्ष, माहेरची झाडी, शुभेच्छा वृक्ष, स्मृतिवन उभारण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. राज्यातील अबालवृद्ध या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. वैयक्तिक, सार्वजनिक व संस्थात्मक पातळीवर होणाऱ्या वृक्षलागवडीची वन विभागाकडे नोंदणी करावी, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वन विभागाच्या कार्यालयात माहिती तंत्रज्ञान कक्ष उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. वनहक्क कायद्याने जे पट्टे आदिवासी बांधवांना देण्यात आले आहेत, तिथे फळझाड लागवडीला प्रोत्साहन देऊन त्याचा वृक्ष लागवड कार्यक्रमात समावेश करावा, आश्रमशाळा तसेच वसतिगृहांच्या ठिकाणी ही वृक्ष लागवड करता येऊ शकेल, असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी यावेळी सांगितले. वन व्यवस्थापनाची संकल्पना अभ्यासपूर्णरितीने विभागाने राबवावी, जंगलात फळझाडं  लावावीत जेणेकरून वन्यजीवांकडून शेतकऱ्यांच्या फळझाडांचे नुकसान टळू शकेल, खासगी क्षेत्रात कांदळवन लागवडीला प्रोत्साहन द्यावे, त्याचे उत्तम नियोजन करावे, वन वणवे रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा अशा सूचना वित्त व‍ नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिल्या.  खासदार विनायक राऊत यांनी वृक्ष लागवडीचा हा उपक्रम एक गरुड झेप झाल्याची भावना यावेळी व्यक्त करतांना संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर कांदळवन आणि सुरुची झाडं लावावीत, पश्चिम घाट क्षेत्रात फळझाड लागवड करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. बैठकीत कोकण विभागातील सर्व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कामाच्या पुर्ततेचे सादरीकरण केले. कोकण विभागात सात जिल्ह्यात मिळून १ कोटी ४१ लाख १३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे आतापर्यंत ९६ लाखांहून अधिक खड्डे खोदून तयार झाले आहेत. विभागाची हरित सेनेची नोंदणी जवळपास ९६ टक्क्यांहून अधिक आहे. मागील दोन वर्षात लावलेल्या कोकण विभागातील जिवंत वृक्षांची सरासरी अनुक्रम ७७ आणि ८३ टक्के इतकी आहे अशी माहिती आज बैठकीत देण्यात आली. वन सचिव विकास खारगे यांनी देखील यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Achukvarta